धेयप्राप्ती साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निश्चित ध्येय

निश्चित ध्येय

यशस्वी होण्यासाठी जी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे निश्चित ध्येय किंवा ध्येयाचा निश्चितपणा. आपल्याला काय पाहिजे याच स्पष्ट ज्ञान. कारण त्याशिवाय बाकीचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. स्पष्टता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. जे लोक अतिशय प्रभावीपणे काम करतात त्यांचं सर्वात प्रमुख कारण हेच असतं की त्यांचं उद्दिष्ट त्यांच्या समोर बिलकुल स्पष्ट असतं.

"तुम्ही कुठे जात आहात तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कुठे पोहचाल कोणास ठाऊक."

जे लोक यशस्वी होतात ते एक निश्चित ध्येय समोर ठेवून मेहनत करतात. तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे माहीत असल्या शिवाय ते मिळणार कसं? निश्चित ध्येयच समोर नसेल तर जाणार कुठे? आणि तरीही कोणी गेला तरी पोहोचणार कुठे?

समुद्रप्रवासावर निघालेल्या प्रत्येक जहाजाच्या कप्तानाला माहीत असतं की आपल्याला कुठे जायचं आहे. त्यामुळेच समोर ते इच्छित ठिकाण बहुतांश वेळ दिसत नसतानाही तो जात राहतो आणि अखेर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो.

ध्येय स्पष्टपणे ठरवून कागदावर लिहून घेणे हे ध्येयप्राप्तीच्या दिशेने पहिले पाऊल आहे. सर्वप्रथम तुम्ही स्वतःसाठी निश्चित ध्येय आणि ते मिळवण्यासाठी एक निश्चित तारीख ठरवण्याची गरज आहे. ध्येय निश्चित करणे ही धेयप्राप्तीची सुरुवात आहे. ध्येय निश्चित झाल्यावर ध्येय प्राप्तीच्या वेडाने मनाला व्यापून टाका. एकाच ठिकाणी नाही तर बऱ्याच ठिकाणी आपले ध्येय लिहून ठेवा. नेहमी डोळ्यासमोर ठेवा.

Out of sight is out of mind असं म्हणतात. म्हणजे नजरेआड कुठली गोष्ट गेली तर माणूस विसरू शकतो किंवा तीव्रता कमी होऊ शकते. आणि खरं सांगायचं तर सगळा खेळ तीव्रतेचा आहे.
तुमचं ध्येयच तुमचं जग होऊन जायला पाहिजे.

कुठल्याही मोठ्या यशाचा आरंभबिंदू म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे याचा स्पष्ट निंर्णय. ज्या क्षणी तुम्ही एक वेगळेपण अनुभवता. त्या क्षणी तुम्ही तुमच्या जीवनाचा ताबा घेता. आणि स्वतः वर निंयंत्रण असल्याची जाणीव सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

अपयशी माणूस ध्येयशून्यपणे भटकत राहतो. यशस्वी लोकांजवळ निश्चित ध्येय असतं.

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हिटलरच्या छळछावणीत तब्बल तीन वर्षे व्यतीत करणाऱ्या एका माणसाने निश्चित ध्येयाची आवश्यकता किंवा अनिवार्यता स्वतःच्या उदाहरणाद्वारे सांगितलं आहे. व्हिक्टर फ्रँकल त्या माणसाचं नाव होतं. सध्या ही व्यक्ती अमेरिकेच्या एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठात कार्यरत आहे. ही व्यक्ती मनोरोगतज्ञ सुध्दा आहे.

नाझी छळछावण्या मध्ये लोक रोज सकाळी मृत्यूला सामोरे जाण्याची संभावना घेऊनच झोपेतून उठायचे. नाना प्रकारचे छळ, विषारी वायू आणि उपासमार हे या लोकांचं रोजचं नशीब होतं. कित्येक वेळा स्वतः मृत्यूच्या तोंडातून बचावलेल्या व्हीक्टर फ्रँकल यांनी जवळून छळाचं निरीक्षण केलं - छळ करणाऱ्यांचं आणि छळ सहन करणाऱ्यांचं- दोघांचंही.

ते म्हणतात, 'छळछावण्यांमध्ये सारख्याच परिस्थितीला तोंड देताना एक जण मरायचा आणि दुसरा वाचायचा'.

व्हीक्टर फ्रँकल यांना जे दिसलं ते असं की ज्या लोकांसमोर आयुष्यात काही निश्चित ध्येय होतं ते लोक वेगवेगळ्या छळातून जिवंत बाहेर यायचे. पण ज्यांचाजवळ जिवंत राहण्याचं काही कारण किंवा उद्देश नव्हता असे लोक सहज आणि पटापट मरून जायचे.(अखेरीस या छळछावण्यां मधून शंभरात सरासरी चार पाच लोकांची जिवंत सुटका झाली.)

स्पष्ट चित्र


ध्येय निश्चित झाल्यावर तुम्ही तुमच्या मनाला धयप्राप्ती च्या वेडाने आणि ध्येय प्राप्त होणारच या विश्वासाने अश्या प्रकारे व्यापून टाकायला पाहिजे की तुम्ही स्वतःला ध्येय प्राप्त झालेल्या अवस्थेत पाहू शकता.

मायकल अँजेलो नामक शिल्पकाराला जेंव्हा विचारलं गेलं की हा जो दगडाला कोरून इतका छान पुतळा बनवला ते तू कसं केलं. शिल्पकार म्हणाला, 'काहीच नाही. पुतळा आधीच तिथे होता - मी फक्त वरवरचा नको असलेला दगड काढून टाकला'.

दगडात होता हेही खरंच आहे. पण पहिल्यांदा हा पुतळा त्या शिल्पकाराच्या डोक्यात होता.

ध्येय निश्चित आणि स्पष्ट असल्या शिवाय यशस्वी होण्या किंवा न होण्याचा मुद्दाही उपस्थित होत नाही.

तुम्ही तुमच्या ध्येया बद्दल इतकं स्पष्ट होण्याची गरज आहे की त्याचं चित्र तुमच्या डोक्यात आणि डोळ्यांसमोर स्पष्टपणे उभं राहायला पाहिजे. प्रत्यक्षात येण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डोक्यात ते प्रत्यक्षात आल्याइतकं स्पष्ट पाहू शकायला पाहिजे. ज्याप्रमाणे मायकल अंजिलोने पुतळा कोरण्याआधी स्वतःच्या डोळ्यांसमोर त्या पुतळ्याचं स्पष्ट चित्र पाहिलं त्याप्रमाणे तुमच्या ध्येयाचं चित्र तुम्हाला स्पष्टपणे पाहता यायला पाहिजे

ध्येय निश्चित करा.
तुमच्या ध्येयाला मनात कोरून टाका.
ध्येयाने झपाटून जा.
यश तुमच्याकडे अक्षरशः ओढलं जाईल.

निश्चित ध्येय आणि मेंदू

लक्षात ठेवा आपल्या मेंदूला आपल्या ध्येयाबद्दल स्पष्ट आणि सरळ सूचना लागतात. संपूर्ण शक्ती आणि तीव्रता एका निश्चित ध्येयावर एकवटून आणि धेयप्राप्ती पर्यंत निरंतर मेहनत करून आपण यशस्वी होतो. ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या सर्व शक्तींना एका सुस्पष्ट आणि सुनिश्चित ध्येयावर केंद्रित कराल अगदी त्या प्रमाणात तुम्ही यशस्वी व्हाल.

निश्चित ध्येय असेल तर आपलं मन आपली सर्व शक्ती त्या ध्येयाच्या प्राप्तीपर्यंत त्या ध्येयावर केंद्रित करू शकतं. या उलट निश्चित ध्येय नसेल तर आपली शक्ती वायाच जाणार.  निश्चित लक्ष नसेल तर तसाही तुम्ही नेम धरू शकत नाही.

स्पष्ट आणि निश्चित ध्येय असलेला माणूस अतिशय खडतर रस्त्यावर सुद्धा प्रगती करेल. ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही गुळगुळीत असला तरी कुठेही पोहचणार नाही.
ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही. पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे.
अश्या माणसासाठी काहीच अशक्य नाही ज्याला माहीत आहे त्याला काय पाहिजे आणि ते मिळवण्यासाचा ज्याने निश्चिय केला आहे.
कुठलीच प्रतिकूल परिस्थिती इतकी शक्तीशाली असू शकत नाही की निश्चित ध्येय असलेल्या माणसाला ती कायमचं अडवून ठेवू शकेल.
निश्चित ध्येय आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा दृढ निश्चय केलेल्या माणसाला भेटल्यावर विरोध आणि अडथळे गायब होऊन जातात.
लेखक:- अब्दुस्-सलाम चाऊस (यशशास्त्र पुस्तक)

हे पण वाचा
  • यशसाठी आवश्यक प्रयत्न अणि चिकटी
  • आईफोन चा निर्माता स्टीव्ह जॉब्स याचे यशाचे मंत्र
मग मित्रानो कसा वाटला हा लेख तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा. तुमच्या मिंत्रांसोबत हा लेख शेर करा. आमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा. फेसबुक वर अशे अप्रतिम लेख आणि सुविचार यांचा चांगला संग्रह आहे ते बघायला विसरू नका. धन्यवाद.

إرسال تعليق

0 تعليقات