मनाची एकाग्रता

मनाची एकाग्रता

एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्‍याच्‍या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्‍याला कोणत्‍याही प्रकारच्‍या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्‍याची ख्‍याती सर्वत्र पसरली होती. त्‍याने त्‍याच्‍या शिष्‍यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्‍यास सुरुवात केली होती.

त्‍याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्‍गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्‍पर्ध्‍याचे कच्‍चे दुवे ओळखून त्‍याला सहज पराभूत करण्‍यात त्‍याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्‍याने वृद्ध योद्धा सोडल्‍यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते.

त्‍याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्‍याच्‍या मनात अहंकार जागृत झाला. त्‍याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्‍य' हे बिरूद लावून मिरवू. त्‍याने वृद्ध योद्ध्याला आव्‍हान दिले. शिष्‍यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्‍याचे आव्‍हान स्‍वीकारले.

तरूण योद्धा ठरलेल्‍या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्‍यातील विजयाची कल्‍पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्‍ये त्‍याच्‍यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्‍या प्रत्‍येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता. तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्‍याने वृद्धाला अपशब्‍द वापरण्‍यास सुरुवात केली.

जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्‍याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्‍याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्‍याने स्‍वत:हून हार पत्‍करली व तेथून पराजित होऊन निघून गेला.

तो गेल्‍यावर शिष्‍यांनी व वृद्धाच्‍या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्‍हाला अपशब्‍द वापरत होता तरी तुम्‍ही शांत कसे राहिलात'' तेव्‍हा वृद्ध गुरु म्‍हणाला,'' मुलांनो कोणत्‍याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्‍वाची असते. कोणत्‍याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''

तात्‍पर्य : मनाची एकाग्रता साधल्‍याने बरेचशी कामे साध्‍य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्‍यास हमखास यश मिळतेच.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या