बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेला खलनायक गब्बरसिंग साकारणारे अभिनेते अमजद खान

आजचा दिनविशेष

१२ नोव्हेंबर १९४०:-

गब्बरसिंग उर्फ़ अमजद खान



हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक अमजद खान यांचा जन्मदिन. शोले चित्रपटात त्यांनी साकारलेला गब्बरसिंग हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी खलनायकांपेकी एक आहे.

१२ नोव्हेंबर १९४० रोजी पेशावर, ब्रिटीश इंडिया (आता पाकिस्तान)मध्ये जन्मलेल्या अमजद खान यांचे २७ जुलै १९९२ रोजी मुंबईमध्ये निधन झाले.आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी 'शोले', 'परवरिश', 'मुकद्दर का सिकंदर', 'लावारिस', 'हीरालाल-पन्नालाल', 'सीतापुर की गीता', 'हिम्मतवाला' आणि 'कालिया'सारखे हिट सिनेमे दिले. जवळपास १३० सिनेमांत कारण करणा-या अमजद खान यांचे अनेक डायलॉग्स आजही आठवणीत आहेत.

शोले सिनेमातील असं कॅरेक्टर जे भारतीय सिनेमातील अजरामर व्यक्तिरेखांपैकी एक आहे. खरंतर या कॅरेक्टरसाठी आधी डॅनीला साईन करण्यात आले होते. मात्र फिरोझ खानच्या 'धर्मात्मा' सिनेमासाठी डॅनीनं "शोले" सोडला आणि अमजद खानची वर्णी लागली. मात्र, ‘शोले’साठी दिलेला मानधनाचा चेक आजही त्याच्याकडे पडून आहे. ‘माझ्याकडे चेक आहे पण, माझी भूमिका कुठे गेली?,’ असा प्रश्न डॅनी आजही गमतीत विचारतो.



अमजदची निवड झाल्यानंतरही त्याचा आवाज ‘गब्बर’च्या व्यक्तिरेखेसाठी योग्य नाही, अशी सलीम-जावेदची तक्रार होती... उलट, अमजदचा चिरका आवाज आणि त्याचं ते विक्षिप्त हसणं हीच गब्बरची ओळख बनली. अमजद खान आणि गब्बर कधीही वेगळे करता येणार नाहीत. सिनेमातील अमजद खानच्या अप्रतिम अभिनयाने गब्बरच्या भूमिकेला चार चॉंद लावले... एक सत्य असेही आहे, की 'शोले'पूर्वी अमजद खान यांना क्वचितच लोक ओळखत होते. मात्र या सिनेमातील गब्बरच्या भूमिकेने त्यांना स्टारडम मिळवून दिले. 'अरे ओ सांबा कितने आदमी थे' किंवा 'ये हात मुजे दे दे ठाकूर' असे हिट डॉयलॉग अमजद खानच्या तोंडी होते. तसं पाहिलं तर त्या सिनेमात तो प्रत्यक्ष पडद्यावर येतो तेच मुळात सिनेमा सुरू होऊन जवळपास दीड तासानंतर! मात्र तोपर्यंत त्याच्याबद्दलच्या नुसत्या संवांदातून त्याची दहशत जाणवायला लागलेली असते.... आणि अचानक "सूअर के बच्चों!”.......त्या सिनेमाच्या पडद्यावर तो पहिल्यांदा दिसतो तेव्हाच कानफटात मारल्यासारखे हे शब्दही आपल्या डोक्यात घुमतात. सिनेमा पहिल्यांदाच बघणारे एकदम खुर्चीत सावरून बसतात आणि लहान मुलं घाबरून आई-बापाचे हात घट्ट धरतात!!

अमजद खान यांनी १९८३ च्या ‘हिम्मतवाला’ चित्रपटात शेरसिंग बंदूकवाला या खलनायकाची भूमिका रंगवली होती पण गब्बरची सर त्याला नाही. "शोले"च्या निर्मिती अवस्थेच्या प्रारंभापासून ‘शोले’तला अमजद खान हा एकमेव नट असा होता, जो सगळ्यात असुरक्षित होता, ज्याच्या क्षमतांबद्दल अगदी शूटिंगच्या अखेरच्या दिवसांपर्यंत सहकारी कलावंत-तंत्रज्ञांना शंका होत्या. एका क्षणी लेखक सलीम-जावेदने अमजद खानला डच्चू देण्याचा विचार दिग्दर्शकाकडे बोलून दाखवला होता. पुढे महत्प्रयासाने अमजद खानने व्यक्तिरेखेवर ताबा मिळवला.शूटिंग संपता-संपता ‘इसकी आवाज बहुत ढिली है’ असं कारण पुढे करत अमजद खानच्या संवादांचं दुसऱ्याच्या आवाजात डबिंग करण्याचा विचार काही विघ्नसंतोषींनी दिग्दर्शकाच्या डोक्यात पेरला होता. अमजद खान पुरता खचला होता, पण सिनेमा रिलीज झाला आणि गब्बरचं गारूड प्रेक्षकांवर चढू लागलं. अमजद खान नव्हे, तर "गब्बर" हाच सेलेब्रिटी बनला.


काही दिवसांनी त्याला आणि असरानीला गुजरातमधल्या एका स्टुडिओच्या उद‌्घाटनासाठी आमंत्रण आलं. सोबत अमजदचा मुलगा शादाबही होता. पोराला वाटेत तहान लागली म्हणून एका छोट्या टपरीवजा दुकानापुढे गाडी थांबवली गेली. अमजद खान गाडीतून उतरला, दुकानात शिरला, तोच "कितने आदमी थे?' हा दुकानातल्या रेकॉर्डवर सुरु असलेला डायलॉग त्याच्या कानावर आला. दुकानदाराने असरानी आणि अमजदला ओळखलं नाही. पण त्या आवाजाने अमजद एकदम स्तब्ध झाला. त्याचे डोळे चमकले. चेहऱ्यावर समाधान झळकलं आणि दुसऱ्या क्षणी आनंदाच्या भरात त्याने बसकण मारली आणि आनंदातिरेकाने सगळ्यांदेखत त्याला रडू कोसळलं… तसं त्यापूर्वी के. एन. सिंग आणि प्राण यांनी साकारलेल्या खलनायकांनी प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवली होती, परंतु अमजद खानच्या गब्बरने लोकप्रियतेचे सगळे उच्चांक पार केले होते. ब्रिटानियाच्या ग्लुकोज बिस्किटांसाठी वापरण्यात आलेला तो व्यक्तिरेखेवर आधारलेला तो पहिला ब्रँड ठरला होता.आज ४० हून अधिक वर्षांनंतरही गब्बरने आपली झळाळी गमावलेली नाही…


लेखक : विनोद शिवाजी गोरे

सोर्स::- https://vinod-gore.blogspot.in/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या