बोधकथा कार्पेन्टर चे घर | Moral Story Carpenters House

बोधकथा कार्पेन्टर चे घर

खरोखरच विचार करायला लावणारा लेख आहे ......

एक कार्पेन्टर म्हणजे सुतार होता. तो लाकडी घरे बांधण्यामधे एक्सपर्ट होता. (इंग्लंड-अमेरिकेमधे लाकडाची घरे बांधायची पद्धत आहे.) प्रत्येक घर तो जीव ओतून बांधत असे. घरासाठी सर्वोत्तम मटेरियल वापरत असे. त्याचप्रमाणे प्रत्येक घर बांधतांना तो काहीतरी नवीन कल्पना राबवत असे. त्यामूळे त्याने बांधलेली घरे लोकांना आवडत असत.

तो एका कॉन्ट्रॅक्टरकडे नोकरी करत होता. त्याच्यामूळे त्या कॉन्ट्रॅक्टरची चांगली बरकत होत होती. त्यामूळे तो कॉन्ट्रॅक्टर पण खुष होता. तो त्या कार्पेन्टरला उत्तम पगाराबरोबर भरपूर बोनस पण देत होता. सगळे कसे छान चालले होते.

पंधरा वर्षे नोकरी केल्यावर त्या कार्पेन्टरला निवृत्त व्हावे असे वाटू लागले. आता उरलेले आयुष्य बायकोबरोबर आरामात घालवावे असे त्याला वाटू लागले. त्याला पगाराचा चेक मिळणार नव्हता पण त्याची त्याला फिकीर नव्हती. त्याने आपला विचार मालकाला बोलून दाखवला. ईतका चांगला माणूस नोकरी सोडून जाणार म्हणून मालकाला वाईट वाटले. त्याने कार्पेन्टरला निवृत्त होण्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण कार्पेन्टर आपल्या विचाराशी ठाम होता. शेवटी मालकाने विनंती केली की तु शेवटचे म्हणून एक घर बांध, मग मी तुझ्या निवृत्तीमधे कसलाही अडथळा आणणार नाही. मोठ्या मुष्किलीने कार्पेन्टर हे शेवटचे घर बांधायला तयार झाला.

कार्पेन्टरने त्याच्या या शेवटच्या घराचे काम सुरू केले खरे. पण काही दिवसातच दिसू लागले की कार्पेन्टरचे मन त्याच्या कामात नाही. कसेतरी हे शेवटचे घर पूर्ण करून निवृत्त होण्याचा ध्यास त्याला लगला होता. कसेतरी त्याने हे काम उरकले. घर बांधताना स्वस्तातले व खराब मटेरीयल वापरले. त्याच्या कामातील नेहमीची सफाई कोठे आढळली नाही. त्याने बांधलेल्या घरांमधे त्याने बांधलेले हे शेवटचे घर सर्वात खराब म्हणजे 'शॅबी' झाले होते.

घर पूर्ण होताच त्याने मालकाला घर पहायला बोलावले. मालकाने घर संपुर्णपणे हिंडून बघीतले व शेवटी त्या घराची किल्ली कार्पेन्टरला देताना सांगीतले, ' आजपासून हे घर तुझे! ही माझी तुला प्रेमाची भेट.'

हे ऐकुन तो कार्पेन्टर चाट पडला. हे घर आपल्याला मिळणार आहे असे त्याला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. हे घर आपल्याला मिळणार आहे याची त्याला थोडी जरी 'हिंट' मिळाली असती तरी त्याने ते घर कितीतरी चांगले बांधले असते. पण आता त्याचा काय उपयोग?

आपल्या आयुष्यरूपी घराचे पण असेच आहे. आपल्या आयुष्याचे घर बांधण्याकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही, ज्या घरात आपल्याला कायमचे रहायचे असते. मग लक्षांत येते की आपल्या आयुष्याचे घर जसे आपल्याला हवे होते तसे बांधलेले नाही. पण हे जेव्हा समजते तेव्हा फार उशीर झालेला असतो. बर हे घर आयुष्यात फक्त एकदाच बांधता येते, परत परत बांधता येत नाही.

आपणच आपल्या आयुष्यरूपी घराचे कार्पेन्टर असतो. आपण रोजच आपल्या आयुष्याचे घर बांधत असतो. रोजच आपण त्या घराच्या भिंती, छप्पर बांधत असतो, खिळे ठोकत असतो. पण आपण हे काम कसेतरी करत असतो. मन लाऊन हे काम करत नसतो. म्हणून आपल्या आयुष्याचे घर हे आपण बांधलेल्या ईतर घरांपेक्षा 'शॅबी' ठरते.

संस्कारांच्या भक्कम पायावर आपल्या आयुष्याच्या घराची उभारणी करा! त्यासाठी उत्तम विचार, उत्तम आचार, उत्तम संगत, चांगले मित्र/ मैत्रीणी, चांगले छंद असे उत्तम मटेरीयल वापरा. घराच्या दिखाऊपणाकडे जास्त लक्ष न देता त्याच्या 'घर' पणाकडे जास्त लक्ष द्या! मग बघा तुम्हालाच तुमचे आयुष्यरूपी घर सुंदर करायचे आहे.

शेवटी तुमचे आयुष्यरूपी घर कसे बांधायचे हे तुम्हीच ठरवायचे नाही कां?

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या