बोधकथा - खरा संन्यासी कोण?

खरा संन्यासी कोण?

एकदा एक तरुण, संन्यासीकडे गेला आणि म्हणाला, ‘मी सर्व काही सोडून आलो आहे, माझे मन आता संसारात रमत नाही. मला हा संसार नकोसा झाला आहे. काही तरी उपाय सांगा.’ सन्यासी त्या तरुणाला म्हणाले, ‘तू काही दिवस राजाकडे जा; त्याच्यासोबत राजवाड्यात राहा. तिथे तुला नक्कीच आत्मज्ञान मिळेल.’ साधूमहाराजांच्या या उपायावर तो तरुण संभ्रमात पडला, राजाकडे राहून आपला समस्या कशी दूर होईल असा प्रश्न त्याला पडला.

तरुणाची संभ्रमावस्था पाहून साधूमहाराज म्हणाले, ‘तू राजमहालात जाण्याआधीच राजाला तुझ्याबद्दल सर्व माहिती मिळाली असेल.’ संन्यासी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तरुण राजवाड्यात गेला. सगळीकडे सुख समृद्धी असूनही त्या तरुणाचे मन तेथे रमले नाही. पण साधूमहाराजांनी त्याला दिलेल्या सुचनेमुळे त्याला तेथे जबरदस्तीने राहवे लागत होते. एकेदिवशी राजा जवळच असलेल्या नदीत स्नानासाठी उतरला. या तरुणाने देखील स्नान करण्यासाठी जायचे म्हणून आपला अंगरखा काठावर काढून ठेवला होता. तेवढ्यात राजमहालातून आवाज आला, आग लागली... आग लागली... काही क्षणात साऱ्या परिसरात धूर पसरू लागाला.

तरुण लगेच पाण्यातून बाहेर आला आणि आपला अंगरखा उचलून जीव वाचवण्यासाठी पळणार, इतक्यात त्याला राजा अगदी निश्चिंत उभा असल्याचे लक्षात आले. काही झालेच नसल्यासारखे भाव राजाच्या चेहऱ्यावर दिसत होते. यावर तरुणाने राजला विचारले, ‘राजमहालात आग लागलेली असूनही तुम्ही शांत उभे आहात. असे का बरे?’ याप्रश्नावर राजा म्हणाला, ‘मी या राजमहालाला कधी माझा समजलोच नाही. मी जन्माला आलो नव्हतो तेव्हाही हा राजमहाल होता आणि माझ्या मृत्यूनंतरही तो असेल. पण तू कपड्यांसाठी धावलास. याचा अर्थ तुला तुझे मन अजूनही संसरात आहे. तुला एवढा मोह आहे, तर मग संसारात मन नाही असे का म्हणतोस.’

हे ऐकून तो तरुण राजाच्या पाया पडला आणि म्हणाला, ‘मला समजले की संन्यासी महाराजांनी मला तुमच्याकडे का पाठवले. तुमच्याकडे सर्व काही असूनही त्यावर आपला हक्क तुम्ही मानत नाही, मोहावर विजय मिळवला आहे. आणि मी सर्व काही सोडून आल्याचा दावाकरून संसार त्याग करण्याची भाषा बोलत होतो, पण माझं मन अद्यापही संसारातल्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये अडकलेले आहे, मोह सुटलेला नाही. संसार करताना देखील मोह न ठेवता संन्यासी सारखे जीवन जगता येते आणि संकटातही स्थिर राहता येते, हे मला आज कळले’.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या