विलासराव देशमुख- सरपंच ते मुखमंत्री प्रवास । Vilas rao deshmukh marathibiography (जीवन चरित्र)

विलासराव देशमुख


हसतमुख चेहरा, उमदे व्यक्तिमत्व, संयमी स्वभाव, धूर्त व मुरब्बी बाणा, हजरजबाबीपणा, आक्रमक वृत्ती, राजकीय परिपक्वता, राज्याच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य अशा वैशिष्टय़ांमुळे विलासराव देशमुख यांचा भोवती लोकप्रियतेचे वलय आणि चाहत्यांचे वर्तुळ निर्माण झाले होते.

बाभळगावचे सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे संचालक, राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री आणि राज्याचे दोनदा मुख्यमंत्री अशा ३५ वर्षांंतील सातत्यपूर्ण राजकीय प्रवासातून अनेक दिग्गज नेत्यांना मागे टाकत विलासरावांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता.

विलासराव देशमुख यांची कारकीर्द


26 मे 1945 रोजी मराठवाड्यातील लहान गाव बाबळगाव येथे विलासराव देशमुख यांचा जन्म झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून बीएससीचे उच्च शिक्षण घेतलं आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. याच काळात त्यांची मैत्री गोपीनाथ मुंडे यांचा सोबत झाली. हि मैत्री दोघांनी विरोधी पक्षात राहून किती सुंदरतेने जपली हे सर्वांना माहीत आहे.

 विलासराव देशमुख , गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांचा दुर्मिळ फोटो


वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे इ.स. १९७४ मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले. नंतर युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असे करीत करीत ते इ.स. १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.

इ.स. १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. पुढे इ.स. १९९५ पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.

विलासराव देशमुख मुक्त फिरकी घेत असताना.

1995 ची निवडणूक


१९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला दूर केले व राज्यात प्रथमच ख-या अर्थाने काँग्रेसेतर विरोधी पक्षांचे सरकार रुजू झाले. शिवसेना व भाजपला संयुक्तपणे सत्ता मिळाली.

काँग्रेसची देशव्यापी पीछेहाट झाली होती. विलासरावांचीही अवस्था काँग्रेससारखीच होती. याचं निवडणुकीत शिवाजीराव कव्हेकर यांनी विलासरावांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा हादरा होता.

त्यानंतर काँग्रेसच्या बाहेर जाऊन शिवसेनेच्या मदतीने विधान परिषदेची निवडणूक लढण्याचा जुगार विलासरावांच्या अंगलट आला आणि अध्र्या मताने झालेल्या आणखी एका पराभवासह त्यांनी राजकीय वनवास ओढवून घेतला होता.

मुखमंत्री


१९९९च्या निवडणुकीत सेना-भाजपची सत्ता गेली. विलासरावही ९५ हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. म्हणून सत्ता स्थापनेचा अधिकार त्यांचा होता. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने सत्ता हस्तगत करण्याचा निर्णय घेतला. अशा वेळी 'तडजोडी' उमेदवारच मुख्यमंत्रीपदासाठी शोधणे गरजेचे होते. लातूरचे विलासराव देशमुख हे सर्वसंमतीचे अमेदवार ठरले व मुख्यमंत्री झाले.

विलासरावांनी १९९९ ते २००३ आणि नंतर २००४ ते २००९ अशी दोन टर्म्समध्ये आठ वर्षे सत्ता राबवली. वसंतराव नाईकांनंतर इतका काळ मुख्यमंत्री राहणे पवारांनाही जमले नाही, जे चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले होते. ते मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीने छगन भुजबळ, आर आर पाटील, विजयसिंह मोहिते आणि पुन्हा भुजबळ असे उपमुख्यमंत्री बदलले. विलासरावांनी सर्वांशी जमवून घेतानाच आपले वर्चस्वही कायम राखले.

एकदा मुलाच्या चित्रपटाच्या प्रिमियरसाठी सरकारी यंत्रणा राबवल्याच्या आरोपामुळे नंतर मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुलाला व राम गोपाल वर्मा या दिग्दर्शकाला ताजमध्ये घेऊन गेल्याबद्दल झालेल्या टीकेमुळे त्यांना मुखमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. पण सहाच महिन्यांत ते दिल्लीत केंद्रीय मंत्रिपदाच्या खुर्चीत जाऊन बसले. यामुळे त्यांची इनिंग्ज अद्याप संपलेली नाही असेच सर्वाना दाखवून दिलं होतं.

मृत्यू




१४ ऑगस्ट इ.स. २०१२ रोजी भाप्रवेनुसार दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले. विलासराव देशमुख यांच्यावर लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ह्या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या १७ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी अनेक राजकारणी, चित्रपट सृष्टीतील नामवंत आणि लाखो चाहत्यांचा समावेश होता. त्यांत पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, शरद पवार आणि अनेक मंत्री होते.

संकटात जो यशस्वी होतो तो खरा प्रशासक. विलासराव देशमुखांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक संकटांवर मात करत प्रशासनावर आपली मजबूत पकड असल्याचे सिद्ध केले. त्यांची स्मृती राज्याला सतत प्रेरणादायी ठरेल.
शरद पवार राष्ट्रवादी अध्यक्ष.


संदर्भ
https://mr.m.wikipedia.org/wiki/विलासराव_देशमुख
http://rajesambhaji.blogspot.in/2010/12/blog-post_1552.html
http://m.maharashtratimes.com/-/articleshow/5876943.cms?null

कसा वाटला हा लेख. विलासराव देशमुख यांची कुठली गोष्ट तुम्हाला आवडली? कमेंट करून कळवा. आमच्या फेसबुक पेज मराठी मोटीव्हेशन ला लाईक करा. तिकडे तुम्हाला बरेच काही नवीन मिळेल. धन्यवाद.

तुम्हाला हे पण वाचायला आवडेल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या