श्रीमंत - पैसा आला की तो "पैसेवाला" नक्की होतो पण "श्रीमंत" होतोच असं नाहीये...

श्रीमंत

मला नेहमी असं वाटायचं की च्यायला जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो... नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो "पैसेवाला" नक्की होतो पण "श्रीमंत" होतोच असं नाहीये...

श्रीमंत या शब्दाची व्याख्या खुप मोठी आहे. वेदांमध्ये जी "श्री" नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे... श्री या संज्ञेत पैसा,यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अनुस्युत आहेत... फक्त पैसा नव्हे.

हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळींचं निरिक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरंच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत... गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता...

अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची "फिकीर नाही". अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात लाथेलोटेसारखा असला तरी त्याला नियोजन नाही.

बेफिकीरी, व्यसनाधिनता, उधळपट्टी, वागणूकीत अहंकार, बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला. सगळीकडे झगमगाट होता पण त्या झगमगाटामागे दिखावा आणि माज होता. "मी किती महागाची स्कॉच पितो बघ" हे सांगण्यामागे ब्रॅन्डच्या कौतुकापेक्षा, पैशाच्या लेबलला जास्त व्हॅल्यु होती...

ही खरेदी आणि बेफिकीरी घरातल्या इंटॆरिअरपासुन लहानशा खरेदीपर्यंत जिथेतिथे दिसते. सुसंस्कृतपणा खुप कमी पैशेवाल्यांकडे आहे. मुलं काय शिकतायत? यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय याचंच वारेमाप कौतुक. वाचनसंस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याचा जिथेतिथे अभाव दिसत होता...

पण याउलट माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खुपच निराळी आहेत. कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड तर कुणाकडे नेटकं आणि सुबक इंटेरिअर (अजिबात झकपक नाही),
कुणाला पुस्तकांचं कलेक्शन करुन त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला Antic मूर्त्या आणि चित्रं जमवायचा छंद...

कुणाला समाजसेवेची आवड तर कुणाला शेतीची हौस. आणि गंमत म्हणजे सर्व श्रीमंत हे अतिशय Down to earth आणि सुसंस्कृत विचारांचे आहेत...

प्रत्येकाने संपत्तीचं उत्तम, Long Term नियोजन केलेलं आहे. रितसर कागदपत्रे,
त्यांच्या फायली तयार आहेत. सरकारी करांचा भरणा व्यवस्थित केलेला असतो. कुठेही कसलाही Show Off नाही आणि बडेजाव तर त्याहून नाही. स्वत: केलेल्या समाजसेवेचं कौतुक तर अजिबात नाही.

कोट्याधीशाकडच्या पार्ट्यांसोबत गरीबाकडच्या सत्यनारायणालाही आवर्जुन जातात..
कुठेही कसलाही भेदभाव नाही, Attitude तर औषधालाही नाही...

उत्तम मोजकं आणि छान खाणं, भरपूर व्यायाम, सौंदर्याची निगा, मोजके पण सिलेक्टेड दागिने, अदबशीर बोलणं, वागणं... म्हणजे वेदातल्या "श्री" या संकल्पनेला अनुरुप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व ते हेच हो...

आणि मग माझ्या लक्षात आलं की एकतर भरपूर मेहनत करुन, कष्ट करुन, उद्योग करुन किंवा मग लांड्यालबाड्या करुन, जमिनी विकून "पैसेवाला" होता येणं कुणालाही सहज शक्य आहे पण "श्रीमंत" होणं हे एक कष्टसाध्य पण छान व सुंदर "मिशन" आहे...

पैसेवाल्यांना श्रीमंत होणं अशक्य आहे असं मी अजिबात म्हणणार नाही.

तो एक प्रवास आहे, विचारपुर्वक करण्याचा...
तो करायलाच हवा.
तुमचं पैसेवालं असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद आहे हे लक्षात घ्या...

आपण खुप श्रीमंत व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना...!!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या