८ सप्टेंबर, १९३३ - हयात
या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह, हिंदी भाषेमधील अनेक चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.
भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. महाराष्ट्राला लाभलेलं हे सुरांचं देणं.
आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबात झाला. त्यांचा गळा तयार होण्यात मा. दीनानाथांचा मिळालेला वारसा आणि एक एक दिग्गज भावंड यांची मोलाची साथ झाली. आशाताईंनी चित्रपट गायनाची सुरुवात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली.
मधल्या काळात सचिन देव (एस.डी.) बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी केले. तिथून त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. अनेक संगीतकारांबरोबर आशा ताईंनी काम केलं.
१९६० च्या सुमारास ओ.पी.नय्यर यांचं संगीत असणारं ‘आंखोसे जो उतरी है दिलमे’ (फिर वही दिल लाया हूँ ) हे गाणं; १९६५ चं ‘जाईये आप कहां’ (मेरे सनम); १९६८ मधलं ‘वो हसीन दर्द देदो’ (हम साया); चैन से हमको कभी अशी मदहोश करणारी गाणी रसिकांच्या हृदयावर राज्य करायला लागली.
आर. डी. बर्मन यांच्याबरोबर काम करताना ‘पिया तू अब तो आजा’ हे १९७१ चे कारवॉं चित्रपटातील गीत, १९७१ चेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ हे १९७२ चे जवानी दिवानीतले गाणे -ही गाणी आशाताईंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. १९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, 'इन आँखोंकी मस्ती' सारखी शब्दरचना हे सगळंच जमून आलं. ‘दिल चीज क्या है’ या गीताला १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे ‘इजाजत’ चित्रपटातल्या ‘मेरा कुछ सामान’ या त्यांच्या गाण्यालाही १९८६ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
हिंदीबरोबर मराठी गाणी देखील तितकीच सुरेख होती किंवा आहेत असं म्हणायला हरकत नाही. तरुण आहे रात्र अजूनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती - अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची गोडी सगळंच विलक्षण
आशाताईंनी गायलेली चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते इत्यादी गाण्यांची व संबंधित चित्रपटांची केवळ यादीच खूप मोठी होईल.
हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशाताईंनी जुन्या पिढीच्या संगीतकारांपासून ते नव्या दमाच्या संगीतकारांपर्यंत विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर- श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे.
बॉलीवूडच्या तसेच मराठी अनेक अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. महंमद रफी, किशोर कुमार व सुधीर फडके सारख्या गायकांबरोबर देखील त्या गायल्या आहेत तसेच आजच्या नवीन तरुण गायकांबरोबरही त्या गात आहेत. आशाताईनी आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांना आवाज दिला आहे. त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.
नाच रे मोरा, आईए मेहेरबॉं, दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत), तनहा तनहा यहां पे जीना, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ये गाकुळी, जानम समझा करो, मागे उभा मंगेश... अशी विविध प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीतं, मराठी-हिंदी चित्रपट गीतं, नाट्यगीतं, गझल, लावणी, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई आजही तेवढ्याच ताकदीने गातात. हा आवाज संगीताचा कोणताही प्रकार वर्ज्य करत नाही. त्यांनी गायलं नाही असं कोणतही गाणं नाही.
'राष्ट्रीय पुरस्कार', असंख्य 'फिल्मफेअर पुरस्कार', मध्य प्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार', 'महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार' आणि नुकताच २००८ मध्ये मिळालेला 'पद्मविभूषण पुरस्कार' - हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-
२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने 'जीवनगौरव पुरस्कार'ही त्यांना देण्यात आला.
फिल्म फेयर :- बेस्ट फिमेल प्लेबॅक अवॉर्ड :-
* 1968-“गरीबो की सुनो...”(दस लाख-* 1966)
* 1969-“परदे मे रहने दो...”(शिखर-* 1968)
* 1972- “पिया तु अब तो आजा...”(कारवाँ-* 1971)
* 1973-“दम मारो दम...”(हरे रामा हरे कृष्णा-* 1972)
* 1974-“होने लगी है रात...”(नैना-* 1973)
* 1975-“चैन से हमको कभी...”(प्राण जाये पर वचन न जाए-* 1974)
* 1979-”ये मेरा दिल...”(डॉन-* 1978)
राष्ट्रीय फिल्म पुरस्कार :-
* 1981- “दिल चीज क्या है...”(उमरॉव जान)
* 1986 “मेरा कुछ सामान...”(इजाजत)
अन्य पुरस्कार :-
* 1987- नाईटिंगेल ऑफ एशिया अवॉर्ड (इंडो पाक असोसिएशन यु.के.)
* 1989- लता मंगेशकर अवॉर्ड (मध्य प्रदेश सरकार)
* 1997- स्क्रीन वीडियोकॉन अवॉर्ड (जानम समझा करो)
आशाताईंनी गायलेल्या गाण्यांचे जबरदस्त हिट
आशाताई यांना इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांनी सोसलेले कष्ट आणि त्यानंतर त्यांना मिळालेले यश या गोष्टी त्या कधीही विसरू शकत नाहीत. उलट या वाटचालीत भेटलेले सुहृद आवर्जून लक्षात ठेवणार्या आशाताई ह्या एक अतिशय प्रसन्न व साधं व्यक्तिमत्व आहे. वेगवेगळे चढउतार पाहिलेले आशाताईंचे जीवन म्हणजे एक उत्फुल्ल मैफलच आहे.
----------------------------------------
*संकलन :- सतीश अलोनी*
----------------------------------------
----------------------------------------
*संकलन :- सतीश अलोनी*
----------------------------------------
0 टिप्पण्या