नेपोलियन बोनापार्ट या कुशल सेनापती विषयीची एक कथा


'अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही' असे सांगणारा फ्रांसचा पहिला सम्राट नेपोलियन बोनापार्ट या कुशल सेनापती विषयीची एक कथा



ते दोन्ही सैनिक अक्षरशः लटलट कापत उभे होते. कारण? कारण ते दोघेही साक्षात नेपोलियन बोनापार्ट समोर उभे होते!

नेपोलियन!! फ्रान्सचा कुशल सेनानी, प्रचंड धाडसी, अन नीडर, निर्भय नेपोलियन. त्याच्या फ्रेंच सैनिकांनी त्या दोन शत्रुसैनिकांना जेरबंद करून आणलं होतं. त्याचं असं झालं होतं की, दोन्ही सैन्यं एकमेकांसमोर उभी ठाकली होती. युध्दाच्या जय्यत तयारीत, फक्त ठिणगीच पडायचा अवकाश होता. पण तरीही एक संकेत मात्र दोन्ही सैनिकांकडून पाळला जात होता; अन् तो म्हणजे दोन्ही सैन्यातल्या घोडय़ांना त्यांचे सैनिक एकाच ठिकाणी पाणी पाजायला आणत असत. तिथं मात्र शत्रुत्व नसायचं. पण…

पण आज चुकून काही फ्रेंच, अतिउत्साही सैनिकांनी त्या दोन शत्रुसैनिकांना पकडून नेपोलियनपुढं उभं केलं होतं. आता काय होणार होते त्यांचे? काहीही होऊ शकलं असतं. कदाचित शिरच्छेद, कदाचित आयुष्यभर अंधार कोठडी! नेपोलियनच्या निर्णयाकडं लक्ष लागलं होतं. सर्वांचं.

त्यानं सर्व हकीगत ऐकून घेतली, तो उभा राहिला अन् म्हणाला; “ताबडतोब सोडून द्या या दोघांना!” फ्रेंच सैनिक गोंधळून गेले, नेपोलियन पुढे म्हणाला, “एकतर अजून युध्द सुरू झाले नाहीये. शांतता काळात मला ही धरपकड मान्य नाही. शिवाय यांनी काहीच अपराध केला नाहीये.” त्यामुळे सोडून द्या त्यांना!” खरेच नेपोलियन जेवढा शूरवीर होता, तेवढाच तो उदार अंतःकरणाचाही होता.

होय, वार्‍याच्या गतीनं घोडदौड करणार्‍या त्याच्या महत्त्वाकांक्षेला त्यानं प्रचंड उद्योगाची जोडही दिली होती. आपल्या अवघ्या 45 वर्षांच्या अल्पायुष्यात तब्बल 52 लढाया लढणारा नेपोलियन अवघी एक-फक्त एकच लढाई हरला होता; वॉटर्लूची लढाई.

विशेष म्हणजे जिंकलेल्या 51 लढायांपैकी काही लढायांमध्ये तर त्याच्या सैनिकांच्या पायात बूटही नव्हते! म्हणूनच तर, “इंपॉसिबल? इटस् नॉट अ फ्रेंच वर्ड” असं मोठय़ा अभिमानानं म्हणणार्‍या नेपोलियन बोनापार्ट या सम्राटांच्या सम्राटावर जगात सर्वाधिक पुस्तकं लिहिली गेली आहेत!

त्यानं त्या दोन्ही निरपराध सैनिकांना जवळ बोलावलं, प्रेमानं त्यांच्या पाठीवर थाप मारली; अन् तो म्हणाला, “जा! तुमच्या छावणीत परत जा!” नेपोलियनचे आभार मानून ते निघून गेले, अन् नेपोलियन आपल्या सेनापतीला म्हणाला,“या दोन सैनिकांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलंय!” सेनापतींना काहीच समजलं नाही.

दुसर्‍या दिवशी नेपोलियनने एका सरदाराला सांगितलं की, 'तू शत्रूवर हल्ला कर; थोडय़ा वेळानं तू पळ काढ. शत्रू तुझा अन् तुझ्या सैन्याचा पाठलाग करेल. करू दे. तू दूर दूर पळून जा.’ त्याचवेळी नेपोलियनने दुसर्‍या सरदाराला सांगितलं, 'तू वाटेत दबा धरून बस, आणि पाठलाग करणार्‍या शत्रूवर पाठीमागून गोळ्यांचा पाऊस पाडा’

सर्व काही ठरल्याप्रमाणं घडलं. बलाढय़ फ्रेंच सैन्य घाबरून पळतंय हे पाहून शत्रूनं बेभानपणानं पाठलाग केला, अन् टप्प्यात येताच दबा धरून बसलेल्या सैन्यानं प्रचंड गोळीबार केला;

शत्रू सैन्य किडय़ामुंगीसारखं पटापट मरून पडू लागलं! कारण? नेपोलियन आपल्या विजयी सेनेला म्हणाला, “मी जेव्हा त्या दोन कैद्यांच्या पाठीवर थाप मारली होती, त्यावेळी माझ्या लक्षात आलं होतं की, त्यांच्या फक्त छातीवर चिलखत होतं, पाठीवर नव्हतं!”

"नेपोलियनचे निरीक्षण, लक्ष, किती सूक्ष्म होतं आणि त्यामुळेच तो अवघड लढाईसुध्दा कशी लीलया जिंके याचेच हे उत्तम उदाहरण.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या