बोधकथा - मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी.

मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी.

एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला. त्याला पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल. भिकारी त्याच्यापाशी जाऊन भीक मागू लागला. भिकाऱ्याने त्याला भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो शेटजी म्हणाला, "तू तर नेहेमी इतरांना काहीना काही मागतच फिरतोस, पण कधी कुणाला कांही देतोस तरी का?" तेव्हा तो भिकारी म्हणाला, "शेठजी, मी एक भिकारी आहे. मी नेहेमीच लोकांना भीक मागतच फिरतो. कुणाला कांही देण्याची माझी काय ऐपत असणार?"

"अरे, तू जर कुणाला कांहीच देऊच शकत नाही तर तुला भीक मागण्याचाही कांही अधिकार नाही. मी स्वतः व्यापारी आहे, आणि माझा व्यवसाय देण्या-घेण्याचा आहे. भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे कांही असेल तरच मी तुला भीक देईन." शेटजी उत्तरले.

इतक्यात स्टेशन आले आणि ते शेटजी स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी शेठजीच्या बोलण्यावर विचार करू लागला. शेठजींनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले. त्याच्या मनात आले की शेटजी म्हणाले ते बरोबर असावे. मी कुणाला भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भीक मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी, मी लोकांना काय देऊ शकणार? पण मग मी तरी किती दिवस लोकांना कांही ना कांही दिल्याशिवाय केवळ भिकच मागत राहायची?

बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कुणी व्यक्ती आपल्याला भीक घालील त्याला कांही ना कांही मी जरूर देईन. पण काय द्यायचे? जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे, ती व्यक्ती इतरांना खरेच काय देऊ शकेल? दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता पण त्याला उत्तर सापडत नव्हतं.

विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता. तेव्हढ्यात त्याचे लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडांकडे गेले. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला भलताच भावला आणि त्याने लगेच कांही फुले तोडून पिशवीत भरून घेतली.

तो गाडीत शिरला आणि नेहेमीप्रमाणे भीक मागू लागला. जो कुणी त्याला भीक घालीत असे त्याला तो आपल्या पिशवीतील कांही फुले काढून देत असे. ती सुगंधी, ताजी फुले बघून लोक खुश होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली. आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली.

कांही दिवसांतच त्याच्या लक्षात आले की त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे. तो रोजच्या रोज स्टेशनजवळील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जो पर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक भीक घालीत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत. आता हे रोजचेच झाले होते. असेच एक दिवस गाडीत भीक मागत असतांना त्याला तोच सुटाबुटातील मनुष्य पुन्हा दिसला. तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला, "शेटजी, आज बघा मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत.

तुम्ही मला आज भीक दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला कांही फुले देईन." शेटजीने त्याला भिकेमध्ये कांही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुले ठेवून घेतली. भिकाऱ्यातील हा बदल बघून शेटजी खुश झाले होते. ते म्हणाले, "व्वा! क्या बात है? आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास." एव्हढं बोलून तो शेटजी गाडीतून स्टेशनवर उतरून चालता झाला. पण त्या शेटजीने बोललेले एक वाक्य, “आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास”, त्याच्या मनात घर करून गेलं. तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसू लागली. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असे त्याला वाटू लागले.

विचार करीतच तो गाडीखाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला, "नाही, मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी. मी सुद्धा त्या शेटजीसारखा एक छान व्यापारी होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो." आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही.

साधारणपणे एक वर्षानंतर याच स्टेशनवर दोन सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मितहास्य करीत विचारले, "ओळखलंत मला?

आता त्याच्याकडे पाहत तो दुसरा माणूस उत्तराला, "नाही, मला कांही आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत."

पहिला : "नाही, नाही! शेठजी. जरा आठवा. आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत."

दुसरा : "असं? मला तर कांही आठवत नाहीये. या आधी दोन वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो?"
पहिला माणूस हसून उत्तरला, "ह्या आधी दोन्ही वेळेला आपली भेट ह्याच स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती. पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्व आहे हे सांगितले आणि दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे सांगितले होते. आठवतंय?" आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यापारी झालोय आणि माझ्या व्यवसाच्याच संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातोय.

पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला कांही मिळवायचं असेल तर आपल्याजवळचं कांहीतरी द्यावं लागतं. हा देण्याघेण्याचा नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे. मीच मला नेहेमी भिकारी समजत राहिलो. यापलीकडे मी कांही विचार केलाच नव्हता. दुसऱ्या भेटीत तुम्ही मला मी व्यापारी झाल्याचं मला जाणवून दिलं. आणि मग मात्र मला असं पक्केपणे वाटू लागलं मी भिकारी नाही, व्यापारी आहे. हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जागवलात. आज मी खरंच एक चांगला व्यापारी झालोय."

भारतीय ऋषीमुनींनी बहुधा ह्यासाठीच माणसाला स्वतःची ओळख करवून देण्यावर नेहेमीच जोर दिलेला आहे.

सोऽहं शिवोहं !!

शेवटी सगळं कांही मनाच्या समजुतीवर अवलंबून आहे. भिकारी जो पर्यंत स्वतःला भिकारी समजत होता तोपर्यन्त तो भिकारीच राहिला. जेव्हा आपण व्यापारी असल्याचे तो समजू लागला तेव्हा तो खरंच व्यापारी बनला. जेव्हा आपण आपल्याला आपण कोण आहोत हे समजायला लागू तेव्हा मग आणखी समजण्यासारखं राहिलंच काय? होय ना?

इतर लेख : marathimotivation.in


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या