बोधकथा - मोल

मोल

माझ्या ओळखीतल्या एकाला पेन हरवण्याची वाईट सवय होती. तो कायम आपल्या निष्काळजीपणामुळे पेन कुठे तरी विसरून येत असे.आपल्या या सवयीमुळे तो कायम स्वस्तातले पेन खरेदी करून वापरत असे!

त्यामुळे असे किरकोळ किमतीचे पेन हरवले तरी त्याला त्याचे काहीच वाटत नसे. एकदा तो आपल्या मित्रांशी या सवयीबद्दल फुशारकी मारत बोलत होता.विशेष म्हणजे त्याच्या त्या सवयीचे तो समर्थन करत होता! मुळात आपण खरेदी करतानाच एकदम स्वस्तातले पेन घेतो त्यामुळे पेन हरवले तरी त्याचे मुळीच वाईट वाटत नाही, अशा प्रकारे तो त्याच्या निष्काळजीपणाला एका सद्गुणाचे लेबल लाऊ पहात होता. त्याची ती वटवट ऐकून वैतागलेल्या एका मित्राने त्याला सुचवले की " एक काम कर, तू असे स्वस्तातले पेन वापरण्यापेक्षा एकदा एखादा महागडा पार्करचा पेन घे आणि तो किमती पेन नेहमीच्या सवयीने हरवतो का ते बघ!

" त्याने हो ना करत हे चॅलेंज स्वीकारले. मार्केटमधे जाऊन चांगला सातशे रूपयाचा पार्कर कंपनीचा एकदम आकर्षक सोनेरी पेन खरेदी केला. इतका महागडा पेन त्याने आयुष्यात पहिल्यांदाच घेतला होता. दररोज हा पेन त्याने वापरायला सुरूवात केली.मधे एका वर्षाचा काळ गेला; पण हा महागडा पेन त्याने हरवला नाही!

तो विचारात पडला....
असे का घडले असावे?
त्याच्या लक्षात आले की हा पेन त्याच्या नेहमीच्या सवयीने हरवला नाही याचे कारण होते त्या पेनाची किंमत!

जास्त किंमत मोजली असल्यामुळे तो या पेनाची प्रचंड काळजी घेत होता!

माणसाच्या आयुष्याचही असंच असतं!

आपण अशाच गोष्टीची काळजी घेतो ज्या गोष्टीना आपण आपल्या जीवनात अत्यंत मौल्यवान समजतो!

जर आपण आपल्या उत्तम आरोग्याचे मोल जाणत असलो तर नक्कीच आपल्या आहारविहार व नियमित व्यायाम करून आपल्या शरीराची व मनाची काळजी घेऊ. काय, किती आणि कस खायचं याबद्दल सतत सजग राहू.

जर खऱ्या मैत्रीची किंमत आपण जाणत असलो तर मित्रांशी आदराने वागू.त्याच्या सुख दु:खात सामील होवून हे स्नेह नाते जोपासण्याला सर्वोच्च महत्व देऊ.

जर पैशाचे मोल आपल्याला माहीत असेल तर तो जपून वापरू. अनाठाई होणाऱ्या खर्चाला आवर घालू. बचत करून उज्वल भविष्यासाठी तरतूद करून ठेऊ.

जर वेळेचं महत्व आपल्याला माहीत असेल तर प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करू आणि कुठल्याही प्रकारे अनमोल वेळेचा अपव्यय केला जात नाही ना हे पाहू.

जर आयुष्यात वेगवेगळी नाती तुमच्यासाठी मोलाची असतील तर तुम्ही कुणालाही दुरावा देणार नाही.नाती टिकवण्याला आपले प्राधान्य असेल.नाते टिकवण्यासाठी आपण आपल्यात असलेल्या अहंकाराला दूर ठेवू. माफ करून आणि माफी मागून नात्यांचे संगोपन करायला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल.

वरील विवेचनावरून एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की जर तुम्ही निष्काळजी असाल, आयुष्यात कोणत्याही बाबतीत तुमच्या संवेदना बोथट असतील तर तुम्हाला जीवनातल्या कोणत्याच बाबींचे गांभीर्य नाहीच; शिवाय नाती,पैसा, वा स्वत:चे जीवन अशा कोणत्याच गोष्टींची खरी किमत वा महत्व तुम्हाला अजून माहीत नाही!

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या